Jump to content

कमलाबाई किबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रावबहादुर सरदार माधव विनायक किबे यांच्या पत्नी कमलाबाई किबे या कोल्हापूरच्या इतिहासप्रसिद्ध सरदेसाई घराण्यातल्या. हे घराणे पुढे रत्‍नागिरीला जाऊन उद्योगधंद्यांत भरभराटीला आले.

कमलाबाई किबे एक मराठी कवयित्री, कथालेखक आणि सामाजिक विषयावर लेखन करणाऱ्या लेखिका होत्या. आकर्षक, ओजस्वी आणि प्रभावशाली वक्तृत्वासाठी त्यांच्या काळात त्या प्रसिद्ध होत्या. त्यांना साहित्यिक आणि सामाजिक कार्यात मोठा रस होता. भारतात आलेल्या लॉर्ड मॉन्टेग्यू आणि लॉर्ड चेम्सफोर्ड यांना मद्रासला जाऊन भेटणाऱ्या शिष्टमंडळावर हिंदुस्थानातील महिलांच्या प्रतिनिधी म्हणून कमलाबाई निवडल्या गेल्या होता. कमलाबाई किबे या अखिल हिंदुस्थानीय महिला शिक्षण संघटनेच्या सदस्य होत्या. त्यांच्या पतीबरोबरच त्या हिंदुस्थान सरकारच्या इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड्‌स कमिशनच्या दूरस्थ सदस्य होत्या.

कमलाबाई किबे १९१७मध्ये इंदूरमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात व्यासपीठावर होत्या. त्यांचे तिथे भाषणही झाले होते. त्या भाषणाशिवाय कमलाबाईंनी संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी त्यांचा एक निबंध वाचून दाखविला. त्यानंतरच्या भाषणात, ’ज्ञानवृद्धीकरिता वाचन हे प्रमुख साधन असल्याने, मुलांत वाचनाची अभिरुची वाढविण्यासाठी मोठ्यांनी मुलांच्या आवडीचे साहित्य लिहून मायभाषेची सेवा करावी’ असे त्या म्हणाल्या.

लेखन[संपादन]

  • कमलाबाई किबे यांच्या नावावर काही भाषांतरित पुस्तके आहेत. मराठीत अगदी सुरुवातीच्या काळात झालेल्या भाषांतरकर्त्यांत कमलाबाईचे नाव आहे.
  • १९१६ साली त्यांनी हिंदी पुस्तकाच्या आधारे मराठीत सीता चरित्र लिहिले होते.
  • इंदूरच्या मध्यभारत हिंदी साहित्य समितीच्या वीणा नावाच्या मासिकाचा अहिल्या पुण्यतिथीनिमित्त अहिल्यांक नावाचा एक विशेषांक सन १९२८मध्ये प्रकाशित झाला होता. त्यात कमलाबाई किबे यांचा अहिल्याबाई होळकरांचे जीवन व कार्य या विषयावर एक चार पानी चरित्रचित्रणात्मक लेख छापून आला होता.
  • पातिव्रत्य-विचार या अनुसूयाबाई काळे, ताराबाई पाथरे, व कमलाबाई पंतवैद्य यांनी १९३१साली लिहिलेल्या पुस्तकाला कमलाबाई किबे यांची प्रस्तावना होती.

मानसन्मान[संपादन]

  • कमलाबाई किबे या दक्षिण भारतात झालेल्या अनेक महिला संमेलनांच्या अध्यक्षा होत्या.
  • त्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा वार्षिक समारोह झाला होता.
  • पंजाबमध्ये जालंदर येथे झालेल्या प्रांतिक हिंदी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
  • वऱ्हाड प्रांत महिला शिक्षण संमेलनाच्याही त्या अध्यक्षा होत्या. हे संमेलन १९३४साली भरले होते.

बाह्य दुवे[संपादन]

http://www.mssindore.org/index.php/2012-09-02-10-11-14/1917 Archived 2013-11-26 at the Wayback Machine. (इंदूरचे १९१७ सालचे मराठी साहित्य संमेलन)