Jump to content

कांचन परुळेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कांचन परुळेकर
जन्म नितवडे, तालुका भुदरगड,जि.कोल्हापूर
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा सामाजिक कार्य
धर्म हिंदू
वडील शामराव
आई जानकी
पुरस्कार कुसुम पुरस्कार


बालपण[संपादन]

परुळेकर कुटुंब हे मूळ कोकणातले आहे. त्यांचे मूळ गाव नितवडे जे भुदरगड तालुक्यात येते. कांचन यांच्या वडिलांचे नाव शामराव व आईचे नाव जानकी होय. कांचन यांचा जन्म २६ एप्रिल रोजी कोल्हापूर येथे झाला. वडिलांचे नेतृत्व व आईची कष्टाळू वृत्ती व त्याचबरोबर कडक शिस्त, जिद्द पाहिल्याने हे संस्कार लहानपणीच झाले.[१]

शिक्षण[संपादन]

कांचन पहिलीला शाळेत गेल्या नाहीत. बहिणीबरोबर अभ्यास करून त्या एकदम दुसरीला गेल्या. त्यांनी कोल्हापुरातच प्राथमिक शिक्षणासाठी राजारामपुरी विद्यालयात प्रवेश घेतला. कांचन अभ्यासात आघाडीवर होत्याच तसेच त्यांनी वक्तृत्व स्पर्धेतही अनेक पारितोषिके अगदी लहान वयातच पटकावली. राजारामपुरी विद्यालयातून कांचन यांनी ८वीला ताराराणी विद्यापीठात प्रवेश घेतला. लहानपणापासून अंगात भिनलेल धाडस, सभाधीटपणा, वक्तृत्व कला आता नव्या शाळेत नव्याने बहरून आले. कांचन यांनी एन.सी.सी. प्रवेश घेऊन आपल्यातील नेतृत्वाची झलक दाखवून दिली. एन.सी.सी.च्या ऑर्डरनी त्या शाळा दणाणून सोडत होत्या. सामुहिक खेळाच्या तासाला टेबलवर चढून प्रात्यक्षिके दाखविताना त्यांना विलक्षण आनंद होई.[२]

व्ही.टी.पाटील यांची मानसकन्या[संपादन]

कोल्हापूरहून त्या काळचे अग्रणी नेते व्ही.टी. पाटील गारगोटीला (भुदरगड)ला यायचे होते. शामराव यांनी कांचन यांना बरोबर घेऊन येण्याची विनंती केली. गाडीतून येताना व्ही.टी.पाटील यांना ही चुणचुणीत मुलगी खूप आवडली. पुढे कांचन यांना त्यांनी आपल्या मानसकन्या मानल्या.

नोकरी[संपादन]

ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे विद्यालयात १९६९ ते १९७२ कांचन ह्यांनी एन.सी.सी.ऑफिसर म्हणून काम केले. १९७२ला त्या बी.एड.झाल्या. १९७२ला उषाराजे विद्यालयात त्यांनी इंग्रजी विषय शिकवायला सुरुवात केली. चित्र व गाणी या माध्यमातून त्यांनी मुलींसाठी इंग्रजी सोपे व आवडेल असे केले.[३]

स्वयंसिद्धाची सुरुवात[संपादन]

या अध्यापन काळातच त्यांनी विद्यार्थिनींसाठी ‘कमवा शिकावा’ योजनेचा पाया तयार केला. गरीब विद्यार्थिनींना आर्थिक मदत दिली जायची. कांचन ह्यांना वाटले, नुसते पैसे वाटण्यापेक्षा त्यांना जर श्रमाचे पैसे दिले तर ते घेताना त्यांचा स्वाभिमान जागृत होईल. श्रमाला प्रतिष्टा मिळेल. कष्टाची सवय लागेल. या प्रमाणे त्यांनी १६ रु मजुरीवर २ वर्ग रंगवून घेतले. भरतकाम शिकवून शिक्षिकांच्या साड्या भरून घेतल्या. हेच काम त्यांनी १९९२ साली संस्थेच्या स्वरूपात सुरू करून संस्थेला ‘स्वयंसिद्धा’ नाव दिले. स्वयंसिद्धा’ संस्थेच्या कार्याची दखल घेऊन ‘सारडा समान संधी’ हा साडेसात लाख रुपयांचा पुरस्कार कांचनताई परुळेकर यांना मिळाला. कांचनताईंनी ही रक्कम संस्थेच्या कार्यासाठी प्रदान केली. संस्थेच्या कार्याची धुरा आता पुढची पिढी सांभाळत आहे. तृप्ती पुरेकर (स्वयंसिद्धा), जयश्री गायकवाड (स्वयंप्रेरिका), सौम्या तिरोडकर (व्ही.टी.फाऊंडेशन) यांच्यासह अन्य संचालिका सांभाळत आहेत.[४]

स्वयंसिद्धाचे उपक्रम[संपादन]

स्त्रियांसाठी ‘स्वयंसिद्धा’ हे माहेरघर बनले. नाममात्र मूल्य घेऊन ३० प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षणवर्ग चालवले जातात. संगणक हाताळणी, विविध हस्तकला, पस्रेस, पाककलेपर्यंतच्या अनेक व्यवसायांचा यात समावेश आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक जाऊन बचत गट संकल्पना आणि उद्योजकीय प्रेरणा यांचे प्रशिक्षणही संस्था देते. संस्थेची अनेक वैशिष्टय़पूर्ण प्रकल्प आहेत. मार्गदिपा अंतर्गत, गरीब-गरजू १५० विद्यार्थिनींना दर वर्षी आर्थिक साहाय्य, शिष्यवृत्ती, गणवेश व दरमहा मार्गदर्शन दिले जाते. येथे शिकणाऱ्या मुली तीन हजारांपासून तीस हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवतात. शिवण, रेक्झीन पर्सेस, क्रोशा, स्वेटर, ब्युटी कल्चर, स्क्रीन प्रिंटींग, योगासने, हस्तकला, भरतकाम, ग्रंथालय चालवणे, अभ्यास वर्ग, संस्कार वर्ग, काउंटर सेल्समनशीप, व्यक्तिमत्त्व विकास या विषयांवर प्रेरक कार्यशाळांचे काम अव्याहत सुरू आहे. या कामांसाठी कांचन परुळेकर व संस्थेला विविध अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ‘स्वयंसिद्धा’च्या माध्यमातून ४५०० उद्योजिका घडल्या.[५]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "स्वयंसिद्ध उद्योजिका". Loksatta. 2019-11-12 रोजी पाहिले.
  2. ^ "कांचन परुळेकर यांना कुसुम पुरस्कार प्रदान". Maharashtra Times. 2019-11-12 रोजी पाहिले.
  3. ^ Reporter, B. S. (2009-03-20). "Kanchan Parulekar gets 'Sarda Award'". Business Standard India. 2019-11-12 रोजी पाहिले.
  4. ^ http://marathi.eenaduindia.com/News/Kolhapur/2016/03/07123940/womens-day-special-story-on-kanchan-parulekar.vpf[permanent dead link]
  5. ^ "महिला सक्षमीकरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष ः कांचन परुळेकर". Agrowon - Agriculture Marathi Newspaper. 2019-11-12 रोजी पाहिले.