Jump to content

धूळपाटी/अप्पलपोट्यांचे जमाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामायणात सांगितले आहे की सीतेला भुरळ पाडणाऱ्या हरणाच्या अंगभर सोनेरी- चंदेरी ठिपके होते. म्हणजे हे असणार जगातल्या सर्वात देखण्या हरणांपैकी एक: आपले चितळ. माधव जुलियनांच्या शब्दात," देखा किती रम्य डोळे, कसा रंग | दावी कसे पादलालित्य सारंग!" असे मोहक मृग. चितळ हा एक समाजाप्रिय पशू आहे, आणि म्हणून त्यांचे सौंदर्य आपल्या डोळ्यात आणखीच भरते. त्यांचे मोठ- मोठे कळप जिथे त्यांना कमी धोका आहे अशा मनुष्यवस्तीजवळ, उदा. अभयारण्यांतील कुटीरांजवळ गोळा होऊन रात्रभर तळ ठोकून साद देत राहतात.

हे कळप जसे माणसांचे लक्ष वेधून घेतात, तसे त्यांच्या भक्षकांचे- वाघ, बिबटे, रानकुत्र्यांचेही. हा धोका रात्रंदिन भेडसावत असतो, आणि म्हणून ही हरणे सतत सावध असतात. जरा संशय आला की "कुक-कुक" आवाज काढत धोक्याचा इशारा देतात, पुढच्या पायाचा खूर आपटतात, शेपटी वर करून पुठ्ठ्यावरचे पांढरे निशाण फडफडवतात. वाटेल की हिंस्र पशूंची अशी चाहूल लागली की सगळे मिळून आपल्या शिंगा- खुरांच्या बळावर प्रतिकार तरी करायाला पाहतील, किंवा आपल्या वेगाचा लाभ घेऊन सूं-बाल्या तरी करतील. पण चितळांचे कळप यातले काहीच करत नाहीत. रानकुत्र्यांची शिकारीला सज्ज अशी एखादी टोळी आपल्या रोखाने येते आहे असे दिसले की सगळी हरणे एकमेकांकडे धावत येऊन एक घोळका बनवतात, आणि मग प्रत्येक हरीण इतरांना ढुशा मारत त्या घोळक्याच्या आत घुसायला बघते.

ह्या घुसा- घुशीत दाक्षिण्य, वात्सल्य अशांचा काहीही सवाल नसतो. प्रत्येक हरीण केवळ स्वतःची चामडी कशी वाचवायची याचा विचार करत दुसऱ्यांना ढकलून आत शिरायला बघते. हेतू एकच; आपल्या सभोवती दुसरी हरणे असली पाहिजेत, जेणेकरून आपल्या आधी दुसऱ्यांचा बळी जाईल. ह्या दंगलीत मोठे सशक्त नर पार आत शिरतात, माद्या, पिल्ले बाहेर रेटली जातात, शिकारीला बळी पडतात.

चितळांच्यात चट्कन धोक्याची सूचना देतात माद्या. बलिष्ठ नर त्यामानाने बेफिकीर असतात, कारण जरी हिंस्र श्वापदाची चाहूल त्यांना थोड्या उशिरा लागली, तोवर बाकीच्यांचा घोळका बनलेला असला, तरी ते सहज धक्‍का-बुक्की करत त्या घोळक्याच्या आत शिरकाव करून घेऊ शकतात. उलट उशिरा सावध झालेल्या माद्यांना, पिल्लांना घोळक्याच्या परिघावर राहण्याखेरीज गत्यंतर नसते. हरणांची समाजप्रियता ही अशी स्वार्थापोटी उपजलेली आहे.कारण अगदी कळपाच्या परिघावर राहिलेले हरीणसुद्धा एकट्या- दुकट्या हरणाहून कमी धोक्यात असते. जेव्हा भक्षक अखेर हल्ला करतात, तेव्हा सगळी हरणे आपापल्या परीने लाथा-शिंगांनी बचाव करायला पाहतात. त्यातून इजा होईल म्हणून हिंस्र प्राणीही काळजी घेत असतात. एखादे चुकून माकून एकटे दुकटे राहिले तर त्याच्याकडे रोख वळवतात.

भूमितीचा साधा नियम आहे: घोळका छोटा असला तर त्यातले परिघावर असणाऱ्या हरणांचे प्रमाण अधिक; घोळका जितका मोठा, तितके हे प्रमाण कमी. यामुळे चितळांची प्रवृत्ती आहे एकमेकांकडे आकर्षित होऊन मोठ-मोठ्या कळपांत राहण्याची. पण याला अडसर आहे खाद्य पुरवठ्याचा. मर्यादेबाहेर दाटी-वाटी झाली की चारा पुरत नाही, आणि विखुरण्यातून अन्नपुरवठा सुधारतो. अशा दोन परस्पर विरोधी प्रवृत्तींच्या तोलातून कळपांचा आकार ठरला जातो. साहजिकच जेव्हा चारा भरपूर असतो, जेव्हा "हिरवे, हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमालीचे" अंथरलेले असतात, तेव्हा मोठ मोठे कळप जमा होतात. जेव्हा गवत वाळून जाते, खाद्याचा तुटवडा असतो, तेव्हा ते फुटून,छोटे-छोटे जमाव विखरून फिरत राहतात. नजर ठरत नाही असे चितळांचे देखणे कळप पहावे गौरी- गणपतीत; शिमग्यात दिसतात अगदी तुरळक- तुरळक.

असे आहेत हे अप्पलपोट्यांचे जमाव. पण सगळेच पशू काही असे नसतात. या उलट हत्तींची सेना असते लढवय्यांची. वाघ, बिबटे, रानकुत्र्यांची चाहूल लागली की हत्ती, गवे, आणि तसेच पाळीव म्हशी - यांच्यातल्या मुख्यतः मोठ्या माद्या आणि त्यांची पिल्ले- धावत धावत एकत्र येतात. पण अशा गटांत प्रत्येक प्रौढ पशू स्वतःचा जीव बचावायचा विचार करत नसतो, तर त्यांच्या अंगात जोष असतो लढण्याचा, आपल्यातल्या दुर्बलांचे संरक्षण करण्याचा. सगळ्या हत्तिणी गोळा झाल्या की एक संरक्षक फळी उभारतात. शत्रूकडे तोंड करून खांद्याला खांदा लावून उभ्या राहतात, आपल्या पिलांना आपल्या छत्राखाली वाचवायचा आटोकाट प्रयत्न करतात.

[१]

  1. ^ "Buy Sahyachala Ani Mee | सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी by Madhav Gadgil | माधव गाडगीळ online from original publisher Rajhans Prakashan". www.rajhansprakashan.com. 2024-05-14 रोजी पाहिले.