Jump to content

पुणेरी पगडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुणेरी पगडी घातलेले लोकमान्य टिळक

पुणेरी पगडी हा एक महाराष्ट्रातील पगडीचा (डोक्यावर घालायच्या वस्त्राचा) प्रकार आहे. या पगडीचा उगम पेशवाईच्या काळात झाला. महाराष्ट्रातील न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, इत्यादी विद्वान व्यक्ती ही पगडी घालत असत. त्याकाळी आणि आजही पुण्यात पगडी हे मानाचे प्रतीक आहे. पगडीची ओळख कायम राखण्याकरिता लोकांनी तिला भोगोलिक वैशिष्ट्य म्हणून मान्यता मिळण्यावी मागणी केली. ४ सप्टेंबर २००९ रोजी त्यांची मागणी पूर्ण झाली व पुणेरी पगडी ही बौद्धिक मालमत्ता म्हणून जाहीर झाली.

पगडीचे भाग[संपादन]

पुणेरी पगडीच्या वरच्या भागाला माथा म्हटले जाते. उजव्या बाजूला असणारा उंच भाग म्हणजे कोका आणि त्याचे टोक म्हणजे चोच. पगडीचे देखणेपण हे या चोचीवर उवलंबून असते. चोचीला असलेला गोंडा म्हणजे जरतार. पगडीच्या कडेच्या पट्टीला घेरा म्हटले जाते. घेऱ्याखाली कपाळावर येणाऱ्या भागाला कमल, तर आतील भागाला गाभा म्हटले जाते. पगडीवर केलेले जवाहिरी काम, जरतार यांवर तिची किंमत ठरत असे.

इतिहास[संपादन]

१९व्या शतकामध्ये महादेव गोविंद रानडे यांनी पुणेरी पगडी घालण्याची सुरुवात केली, असे म्हणतात..[ संदर्भ हवा ] त्यानंतर लोकमान्य टिळक, तात्यासाहेब केळकर, दत्तो वामन पोतदार यांनीसुद्धा ही पगडी घातली. १९७३ च्या घाशीराम कोतवाल ह्या नाटकानंतर पुणेरी पगडी अधिक प्रसिद्ध झाली.

वापर[संपादन]

आजच्या काळात पगडीचा वापर उत्सव सोहळ्यांमध्ये व शाळा, महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक दिन साजरा करताना केला जातो. तसेच देवीचा गोंधळ करतानाही तिचा वापर होतो. पुण्याच्या कलेचे प्रतीक म्हणून नाटकांमध्ये व चित्रपटांमध्ये पुणेरी पगडीचा वापर अनेकदा दाखवण्यात येतो.

सध्या तयार स्वरूपात मिळणारी पुणेरी पगडी ही पूर्वी कापड घेऊन बांधली जायची. माती किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा डोक्याच्या आकाराचा साचा बनवला जायचा. त्या साचावर कोष्टी म्हणजे विणकर समाजातील कारागीर दर पंधरा दिवसांनी घरोघरी जाऊन पगडी बांधून द्यायचे. सुती कापडाची लाल रंगाची पट्टी, त्याला बत्ती कापड असे म्हटले जायचे, ती कांजीत बुडवून त्याची घट्ट बांधलेली पगडी पंधरा दिवस टिकायची. या कापडामुळेच लाल रंग ही देखील ओळख या पगडीला मिळाली.

बाजाराच्या मागणीनुसार रंग, कापड यांत आता (२०१७ साली) फरक पडला आहे. पगडी तयार करण्याची पद्धतही बदलली आहे. मात्र त्याचे मूळ स्वरूप टिकवून ठेवले आहे. पुण्यातील मुरूडकर झेंडेवाले हे तीन पिढ्यांपासून पगडीची परंपरा जपत आले आहेत. आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या साच्यावरून कागदी लगद्याचा साचा तयार केला जातो आणि त्यावर कापड, स्पंज वापरून पगडी तयार केली जाते व तिला आतून अस्तर लावले जाते. रेशीम किंवा सॅटिनच्या पगडीला अधिक मागणी असते. भगवी, जांभळी, राणी कलर, मोतिया अशा अनेक रंगात पगडी तयार केली जात असली तरीही त्याच्या मूळ लाल रंगाकडेच ग्राहकांचा ओढा आहे.

गणेशोत्सवात गणेशमूर्तीला घालण्यासाठी, पांडुरंगाच्या मूर्तीसाठीही पगडी तयार केली जाते.

बौद्धिक संपदा अधिकार

१० सदस्यीय श्री पुणेरी पगडी संघाने पगडीला भौगोलिक संकेत (GI) टॅग मिळण्यासाठी भौगोलिक संकेत नोंदणीकडे अर्ज केला होता. [१] बौद्धिक संपदा अधिकारांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सीने त्यांच्या वतीने अर्ज दाखल केला. [२] पगडी ओळखण्यायोग्य व्हावी, तिची ओळख आणि पुणेरी संस्कृतीही जपता यावी हा यामागचा उद्देश होता. परिणामी, ४ सप्टेंबर २००९ रोजी, हेडगियरला भौगोलिक संकेताचा दर्जा देण्यात आला आणि पगडी ही पुण्याची अधिकृत सांस्कृतिक ओळख बनली. [३] [१] [४] [५] [६] त्यामुळे पगडींना बौद्धिक संपदा अधिकार (IPR) मिळाला आणि पुण्याबाहेर कोणत्याही पगडीची पुणेरी पगडी या नावाखाली विक्री करणे बेकायदेशीर ठरले. पुणेरी पगडीबरोबरच, यापूर्वी दार्जिलिंग चहा, बनारसी साड्या, तिरुपती लाडू यासारख्या भारतीय उत्पादनांना आयपीआर जारी करण्यात आला आहे. [४]

हे देखील पहा

संदर्भ

  1. ^ a b Shruti Nambiar (2 August 2011). "The Pagadi Unravelled". The Indian Express. pp. 1–2. 13 June 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "Turban legend: Puneri Pagadi may soon get intellectual property tag". Mid-day. 6 April 2009. 13 June 2012 रोजी पाहिले.
  3. ^ "Indian association seeks IPR for 'Puneri Pagadi'". Business Standard India. Business Standard. Press Trust of India. 7 April 2009. 12 June 2012 रोजी पाहिले.
  4. ^ a b "Puneri Pagadi gets GI tag; latest to join protected goods club". Zee News. 21 September 2009. 13 June 2012 रोजी पाहिले.
  5. ^ "Puneri Pagdi obtains geographical indication status". OneIndia News. 3 January 2010. 13 June 2012 रोजी पाहिले.
  6. ^ Chandran Iyer (22 September 2009). "Puneri Pagadi gets pride of place". Mid Day. 13 June 2012 रोजी पाहिले.