Jump to content

मुरलीधर रामचंद्र आचरेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुरलीधर रामचंद्र आचरेकर (जन्म १४ नोव्हेंबर १९०७ - मृत्यू १८ डिसेंबर १९७९) हे रेखाटन, जलरंग आणि तैलरंग या तीन माध्यमांवर प्रभुत्व असणारे चित्रकार होते. ते हिंदी चित्रपटसृष्टीत कलादिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते.[१]

बालपण आणि शिक्षण[संपादन]

मुरलीधर यांचा जन्म महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील आपटे या गावी झाला. थोडकेच शालेय शिक्षण झालेल्या मुरलीधरांचा लहानपणापासूनच चित्रकलेकडे मात्र ओढा होता.[१]

चित्रकलेचे शिक्षण[संपादन]

मोठ्या बंधूंसोबत ते मुंबईला आले आणि वयाच्या दहाव्या वर्षी गिरगावातील 'केतकर आर्ट इन्स्टिटूट' मध्ये त्यांनी चित्रकलेच्या शिक्षणाचा प्रारंभ केला. वयाच्या सोळाव्या वर्षी 'चित्रमय जगत' या नियतकालिकात त्यांचे जलरंगातील एक चित्र प्रकाशीत झाले. ते छायाचित्रणकलाही शिकले. १९२३ ते १९२८ या काळात छायाचित्रणकला आणि शिळामुद्रण पद्धतीचा अभ्यास करून त्यांनी स्वतःचे 'लिथो' मुद्रणालय सुरू केले. याठिकाणी ते चित्रकला आणि छायाचित्रण यामध्ये निरनिराळे प्रयोग करून पहायचे.[२] मात्र पूर्णवेळ चित्रकलेचा अभ्यास करून जे.जे.तील पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता त्यांनी हे मुद्रणालय बंद केले.

तोवरची त्यांची चित्रकलेतील कामगिरी त्यांना सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये थेट वरच्या वर्गात प्रवेश मिळण्यासाठी सहाय्यक ठरली. दुर्दैवाने परिक्षेच्या ऐन वेळी टॉन्सिल्सच्या आजारामुळे ते उत्तरपत्रिका पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना जी.डी.आर्ट ही अधिकृत शासकीय कला पदविका प्राप्त करता आली नाही.[१]

शैक्षणिक काळात मिळालेली पारितोषिके आणि सन्मान[संपादन]

१९२९- त्यांच्या 'एकाग्रता' या व्यक्तिचित्राला भावनगरच्या महाराजांचे पारितोषिक मिळाले होते. पुढे या चित्राला बंगळूर आणि नागपूरच्या प्रदर्शनातही सुवर्णपदक मिळाले होते. लंडनच्या इंपिरिअल इन्स्टिटूटच्या प्रदर्शनातही ह्या चित्राचा गौरव झाला होता.[२]

१९२९- याचा काळात त्यांनी चितारलेले 'शृंगार' हे चित्रदेखील गाजले होते.[१] हे चित्र सध्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या संग्रहात आहे.[२]

१९३०- यावर्षी त्यांच्या 'प्रेयर' या चित्राला बॉम्बे आर्ट सोसायटीचे रौप्यपदक मिळाले होते.[१]

१९३१- यावर्षी त्यांच्या 'रिपोझ' या चित्राला बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले होते.[१]

चित्रकलेतील उच्चशिक्षण[संपादन]

१९३२ मध्ये त्यांनी लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ आर्ट येथे चित्रकलेच्या उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेतला. १९३२ ते १९३४ हा काळ त्यांनी रॉयल कॉलेज ऑफ आर्ट मधल्या उच्चशिक्षणासाठी व्यतित केला. तेथील वास्तव्यात त्यांनी 'गोलमेज परिषद' हे चित्र रंगविले.[३] हे चित्रदेखिल १९३२ मध्ये लंडनच्या इंपिरिअल इन्स्टिटूटच्या प्रदर्शनात प्रदर्शित झाले होते.[२]

कार्यकर्तृत्वाची सुरुवात[संपादन]

१९३५ मध्ये भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड विलिंग्डन यांच्या विशेष शिफारशीने त्यांना पंचम जॉर्ज यांच्या राजारोहणाच्या रौप्यमहोत्सवाी समांरभाची चित्रे रगंविण्यास पाठविले गेले.[३] १९३७ ते १९३९ या कालात ते सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे उपसंचालक म्हणून कार्यरत होते. मात्र प्रशासकीय कामापेक्षा कलानिर्मितीची ओढ अधिक असल्याने त्यांनी नोकरी सोडून[२] आधी दिल्लीत आणि नंतर मुंबईत आपले कलामंदिर (स्टूडिओ) स्थापले. पुढे त्यांनी आचरेकर कला अकादमीची स्थापना केली.[१] १९३५ मध्ये त्यांनी दिल्ली येथे आपल्या कलाकृतींचे पहिले प्रदर्शन भरविले. या कलाप्रदर्शनाचे उद्घाटक होते मंडीचे महाराज. याच ठीकाणी त्यांची चित्रपट दिग्दर्शक करदार यांच्यासी गाठ पडली.[२]

कलादिग्दर्शक[संपादन]

करदार यांच्याशी झालेली ही भेट आचरेकरांच्या जीवनाला वेगळी वाट देणारी ठरली. ही भेट हिंदी चित्रपटसृष्टीसाठी देखिल सुदैवी होती. त्यामुळेच हिंदी चित्रपटसृष्टीली एक जाणकार कलादिग्दर्शक लाभला.[२] पुढे चित्रपट दिग्दर्शक राजकपूर यांच्या आर.के. फिल्म्सच्या अनेक चित्रपटांचे कलादिग्दर्शन मुरलीधर आचरेकर यांनी केले. चित्रपटांच्या कला- दिग्दर्शनासाठी असणारे फिल्मफेर पारितोषिक त्यांना अनेकवेळा मिळाले होते.[३]

कला- दिग्दर्शनासाठी मिळालेली फिल्मफेअर पारितोषिके[संपादन]

१९५८- परदेसी, दिग्द- ख्जावा अहमद अब्बास.[४]

१९६०- कागज के फूल, दिग्द- गुरुदत्त.[४]

१९६२- जिस देश में गंगा बहती है, दिग्द- राजकपूर.[३]

ग्रंथनिर्मिती[संपादन]

मुरलीधर आचरेकरांना कलाविषयक पुस्तकेही प्रसिद्ध केलेली आहेत. ही पुस्तके ते स्वतः सजवीत( मुखपृष्ठ आणि आतील चित्रांकने). रुपदर्शिनी ह्या त्यांच्या पुस्तकात त्यांनी भारतीय कलेतील शास्त्रोक्त व पारंपारिक आकृतिबंध आणि मानवी शरीरबंधाचा पाश्चिमात्यांच्या दृष्टीकोनातून केलेला तौलनिक अभ्यास मांडला आहे. 'फिमेल न्यूड' हे पुस्तक त्यांनी शरिरशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी लिहिले होते. ही दोन्ही पुस्तके त्यांनी कलाशाखेतील विद्यार्थ्यासाठी निर्मिली होती. 'फ्लाईंग गंधर्वाज' या त्यांच्या पुस्तकाला राष्ट्रपतींचा पुरस्कार ( राष्ट्रपतींचा ताम्रपट) मिळाला होता. 'शांतिदूत' हे त्याचे चित्रमय पुस्तक पं. नेहरूच्या जीवनावर होते.[२]

व्यक्तिचित्रणे[संपादन]

तैलरंगातल्या व्यक्तिचित्राप्रमाणे त्यांनी जलरंगातही त्याच ताकदीने व्यक्तिचित्रे काढली. त्यात नर्गिस, वहीदा रेहमान, लता मंगेशकर यांची चित्रे आहेत, ती त्यांनी त्या व्यक्तिनां समोर बसवून काढलेली आहेत.[२]

चित्रांची वैशिष्टे[संपादन]

चित्रनिर्मितीसाठीच्या विशेष शिफारशी आणि आमंत्रणे[संपादन]

१९३५ मध्ये भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड विलिंग्डन यांच्या विशेष शिफारशीने त्यांना पंचम जॉर्ज यांच्या राजारोहणाच्या रौप्यमहोत्सवाी समांरभाची चित्रे रगंविण्यास पाठविले गेले.

१९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सोहळा साजरा झाला. या सोहळ्यात तेथील ऐतिहासिक क्षणांना रेखांकीत करण्यासाठी त्यांना खास विनंती करण्यात आली होती. त्या सोहळ्यातील प्रसंग आचरेकरांनी आपल्या पेन्सिलीने अगदी यथातथ्य पकडले आहेत. अगदी गर्दीच्या प्रसंगातील आकाराने उण्या असणाऱ्या व्यक्तिरेखाही त्यांनी अचूक रेखाटल्या आहेत.[२]

समारोप[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b c d e f g वासुदेव कामत; आचरेकर, मुरलिधर रामचंद्र ; समाविष्ट : विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश; खंड ०६; दृश्यकला; संपा. बहुळकर, सुहास आणि घारे, दीपक; साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशनसंस्था); २०१३; मुंबई (पृ. २१-२५))
  2. ^ a b c d e f g h i j प्रा.मं.गो.राजाध्यक्ष, एम.आर.आचरेकर, समाविष्ट-मास्टर स्ट्रोक भाग ४ था, संपा- प्रफुल्ला डहाणूकर आणि सुहास बहुळकर, जहांगिर आर्ट गॅलरी, २००५.
  3. ^ a b c d https://en.wikipedia.org/wiki/M._R._Acharekar
  4. ^ a b https://en.wikipedia.org/wiki/Filmfare_Award_for_Best_Art_Direction