Jump to content

व्याध (तारा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हबल दुर्बीणीने घेतलेले व्याध-अ व व्याध-ब यांचे छायाचित्र

व्याध (इंग्लिश: Sirius, सिरियस ;) हा रात्रीच्या आकाशातील सर्वांत तेजस्वी तारा आहे. -१.४६ची आभासी दृश्यप्रत[श १] असलेला हा तारा अगस्तीच्या दुप्पट तेजस्वी आहे. व्याध हा पृथ्वीपासून ८.७ प्रकाशवर्षे[श २] दूर असून त्याचा व्यास २५ लक्ष ५ हजार किलोमीटर आहे. व्याधाच्या पृष्ठभागाचे तापमान १०,००० अंश सेल्सिअस असल्याने तो तेजस्वी दिसतो.

वास्तविकतः व्याध एक तारा नसून द्वैती तारा[श ३] आहे; म्हणजेच तो दोन ताऱ्यांची जोडगोळी आहे. यातील मोठ्या ताऱ्याला व्याध-अ आणि श्वेत बटूला[श ४] व्याध-ब असे म्हणतात. हे दोन्ही तारे एकमेकांभोवती परिभ्रमण करतात. एकमेकांभोवती १ परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी त्यांना सुमारे ५० वर्षे लागतात. व्याध-अ आणि व्याध-ब यांपैकी व्याध-ब हा तारा नुसत्या डोळ्यांना दिसत नाही. प्रचंड घनतेमुळे व्याध-ब ताऱ्याचा पृष्ठभाग जास्त कठीण आहे. हे दोन तारे एकमेकांभोवती फिरताना व्याध-अ ताऱ्याचा वायू व द्रव भाग व्याध-ब स्वतःकडे खेचून घेतो. त्यामुळे दोघांभोवती मोठे चुंबकीय क्षेत्र तयार होते.

मृग नक्षत्राच्या मध्यभागी एका सरळ रेषेतले असलेले तीन तारे जोडून ती रेषा पुढे वाढवली की ती व्याध ताऱ्यामधून जाते. त्यामुळे ते तीन तारे म्हणजे मृगाला व्याधाने(शिकाऱ्याने) मारलेला बाण आहे अशी प्राचीन भारतीय खगोलशास्त्रातील कल्पना आहे.

पारिभाषिक शब्दसूची[संपादन]

  1. ^ आभासी दृश्यप्रत (इंग्लिश: Apparent Magnitude - ॲपरंट मॅग्निट्यूड)
  2. ^ प्रकाशवर्ष (इंग्लिश: Light year - लाइट इअर) - प्रकाशाने एका वर्षात कापलेले अंतर.
  3. ^ द्वैती तारा किंवा तारका-युगुल (इंग्लिश: Binary star - बायनरी स्टार)
  4. ^ श्वेत बटू (इंग्लिश: White Dwarf - व्हाइट ड्वार्फ)

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: