Jump to content

मल्हारगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किल्ले मल्हारगड मुख्य दरवाजा

मल्हारगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.[१]पुणे शहराजवळील सासवड या गावानजीक हा किल्ला आहे.[२]


मल्हारगड
नाव मल्हारगड
उंची ३१६६ फुट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव सासवड
डोंगररांग भुलेश्वररांग
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


परिसर[संपादन]

महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून 'मल्हारगड' प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगररांग ही पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत.

इतिहास[संपादन]

पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते. पेशवाई काळात सुरू असलेल्या व्यापारी मार्गावर म्हणजे दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली.[२]

भौगोलिक माहिती[संपादन]

पुण्यापासून मल्हारगड सुमारे ३५ किलोमीटर दूर आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे. समुद्रसपाटीपासून हा किल्ला ३१६६ फूट उंचीवर आहे. केवळ साडेचार ते पाच एकर क्षेत्राचा विस्तार आहे.

गडाची वैशिष्ट्ये[संपादन]

हा मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला आहे. भीवराव पानसे या मराठ्यांच्या तोफखाना प्रमुख असलेल्या व्यक्तीने हा किल्ला बांधला असा दाखला मिळतो.

इतिहास[संपादन]

या किल्ल्याची बांधणी मराठा चे सरदार भीमराव पानसे यांनी केली.भीमराव पानसे हे मराठा तोफखान्याचे प्रमुख होते. सन १७७१-७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात. या पानसेंचा किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे.गडाचे बांधकाम मराठांच्या तोफखान्याचे सरदार श्री भिवराव यशवंतराव आणि कृष्णाजी माधवराव या दोघांनी इसवी सन १७५७ ते १७६० या तीन वर्षात बांधून पूर्ण केले

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

मल्हारगड किल्ल्यावरील प्राचीन मंदिरे

पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने पुढे गेले असता बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात. बाजूलाच एक विहीर आहे. बालेकिल्ल्यात प्रवेश न करता तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक बांधिव टाके लागते. किल्ल्याच्या दक्षिणेला पाण्याचे टाके तटाला लागूनच असून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. तसेच पुढे दोन मंदिरे आहेत. यातील लहान देऊळ खंडोबाचे आणि दुसरे जरा मोठे देऊळ महादेवाचे आहे. खंडोबा आणि महादेव मंदिरामुळे गडाला श्री क्षेत्र जेजुरी आणि श्री क्षेत्र कडेपठारचे स्वरूप आले आहे. फक्त मल्हारगडवरच खंडोबा आणि महादेवाचे एकत्र मंदिर आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेला प्रवेशद्वार आहे. किल्ल्यावरून कऱ्हा नदी, जेजुरीचा डोंगर, कडेपठार, वगैरे दिसतात. गडाकडे जाण्याआधी सोनोरी गावात असणारा पानसे यांचा ६ बुरुजांचा वाडा पाहण्यासारखा आहे. एखाद्या गढीप्रमाणे असणाऱ्या या वाड्यात गजाननाचे व लक्ष्मी-नारायणाचे मंदिर आहे. सोनोरी गावात चुकवून चालणार नाही असे ठिकाण म्हणजे मुरलीधराचे सुबक मंदिर व मंदिरातील अत्यंत देखणी अशी काळ्या पाषाणात घडवलेली श्रीकृष्णाची मूर्ती.[३]

संवर्धन प्रयत्न[संपादन]

किल्ले मल्हारगड महादरवाजा

राजा शिवछत्रपती परिवाराने गेले २ वर्षांत किल्ल्यावरील पाण्याचे टाके साफ करून त्यातील गाळ काढून ते स्वच्छ केले. पुढे किल्ल्याच्या टोकावर असणाऱ्या बुरुजाकडे जाताना अजून एक विहीर लागते. या विहिरीतही पाणी नाही. या बुरुजाच्या खाली एक बुजलेला दरवाजा होता, किल्ल्यावर दुर्ग संवर्धन करणाऱ्या राजा शिवछत्रपती परिवाराने त्यातील पूर्ण माती काढून तो ये-जा करण्यासाठी उघडा केला आहे. याला ७ पायऱ्या आहेत. तसेच या संस्थेने अजून एक केलेले महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे किल्ल्याच्या बरोबर आतील बाजूस आपल्याला मातीच्या ढिगा खाली कित्येक वर्ष बुजलेला शिवकालीन मोठा चौथरा आपल्याला तिथं दिसून येईल व आपले लक्ष वेधून घेऊल, याचे उजवीकडे पुढे गेल्यावर आपल्याला आणखी एक अतिशय लहान दरवाजा दिसतो. झेंडेवाडीकडून आल्यास आपण या दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश करतो. बालेकिल्ल्यावर शिवभक्त वाघाची टोळी या संघटनेच्या कडून छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर मूर्ती बसविण्यात आली आहे, शिवरायांची मूर्ती बालेकिल्ल्यावर आलेल्या प्रत्येक शिवभक्ताचे लक्ष केंद्रित करते.

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

  1. पुण्याहून: पुण्याहून सासवडला जाताना दिवेघाट संपल्यावर काही वेळाने डावीकडे झेंडेवाडी गावाचा फाटा लागतो. तेथून २ कि.मी. वर झेंडेवाडी आहे. गाव पार करून आपल्याला समोरच्या डोंगररांगांमध्ये दिसणाऱ्या 'ण' आकाराच्या खिंडीत जावे लागते. या खिंडीत गेल्यावर समोरच आपल्याला मल्हारगडचे दर्शन घडते. खिंडीतून किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो. झेंडेवाडी फाट्यापासून खिंड पार करून किल्ल्यावर जायला साधारणपणे दीड तास लागतो.
  2. सासवडहून: सासवड पासून ६ कि.मी.वर 'सोनोरी' हे गाव आहे. या गावाला दिवसातून तीन वेळा बस जाते. सोनोरी गावातून समोरच मल्हारगड दिसतो. सोनोरी गावातून किल्ल्यावर जाण्यास अर्धा-पाऊण तास लागतो. डोंगराच्या सोंडेवरूनही गडामध्ये प्रवेश करता येत असला तरी मनोऱ्याच्या बाजूने गेल्यास आपल्याला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते.

राहण्याची सोय[संपादन]

फक्त ५-६ माणसे महादेवाच्या मंदिरात दाटीवाटीने राहू शकतात. गडावर अन्यत्र राहण्याची सोय नाही. मात्र पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावात किंवा झेंडेवाडीत शाळेच्या आवारात राहता येते. सासवड येथे राहण्याची सोय होऊ शकते.

जेवण्याची सोय[संपादन]

जेवण्याची सोय स्वतः करावी. गडाव‍र पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Kale, Rohit Pralhadrao (2018-05-24). Rajwata: Aavishkar Gad Killayacha (इंग्रजी भाषेत). FSP Media Publications.
  2. ^ a b "सोनोरीचा मल्हारगड". सकाळ. 2023-08-13 रोजी पाहिले.
  3. ^ Webdunia. "किल्ले मल्हारगड". marathi.webdunia.com (इंग्रजी भाषेत). 2019-07-04 रोजी पाहिले.