Jump to content

रेवदंडा किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रेवदंडा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान[संपादन]

कुंडलिका नदी अरबी समुद्राला जेथे मिळते, त्या कुंडलिका खाडीच्या मुखावर असलेल्या रेवदंडा गावाचा उल्लेख थेट महाभारत काळात सापडतो. त्याकाळी हे गाव रेवतीक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते. १५ व्या शतकात रेवदंडा गावाचे महत्व ओळखून पोर्तुगिजांनी खाडीच्या मुखावर किल्ला बांधला. किल्ला बांधताना संपूर्ण रेवदंडा गाव भोवती तटबंदी बांधून किल्ल्याच्या कवेत घेतल.

कसे जाल?[संपादन]

मुंबई, पुणेहून रेवदंड्याला जाण्यासाठी थेट बसेस आहेत. रेवदंडा बस स्थानकावर उतरून किनाऱ्यावरून गड पाहायला सुरुवात करावी.

इतिहास[संपादन]

पोर्तुगिज कप्तान सोज याने १५२८ मध्ये किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यापूर्वी १५१६ मध्ये पोर्तुगिजांनी कारखान्यासाठी इमारत बांधली, तिला चौकोनी बुरुज म्हणतात. हिची तटबंदी १५२१ ते १५२४ च्या दरम्यान बांधली गेली. २२ जुलै १६८३ च्या रात्री मराठ्यांनी रेवदंड्यावर हल्ला केला, पण पोर्तुगिजांनी तो उधळून लावला. मराठ्यांनी रेवदंड्याला वेढा घातला. तो मोडून काढण्यासाठी पोर्तुगिजांनी फोंड्यावर हल्ला केला. त्यामुळे मराठ्यांना वेढा सोडून जावे लागले. २५ नोव्हेंबर १७४० रोजी झालेल्या तहानुसार पोतुगिजांनी साष्टीतील गावांच्या बदल्यात रेवदंडा व कोर्लईचा ताबा मराठ्यांना दिला. १८०६ मध्ये इंग्रजांनी याचा ताबा घेतला. १८१७ मध्ये आंग्रेने हा गड जिंकला. पण लगेच १८१८ मध्ये रेवदंडा किल्ला इंग्रजाकडे गेला.

छायाचित्रे[संपादन]

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन]

रेवदंडा गडाच्या तटबंदीचा परिघ ५ किमी आहे. तटबंदी पूर्ण गावाला वेढत असल्यामुळे बहुतेक ठिकाणी ती खाजगी मालमत्तेत गेल्यामुळे पाहाता येत नाही. रेवदंड्यात जाणारा रस्ता तटबंदी फोडून बनवलेला आहे. त्या तटबंदीच्या उजव्या बाजूने गेल्यास आपण प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. प्रवेशद्वारावर पोर्तूगिजांचे राजचिन्ह कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या आत अजून एक दार आहे. त्याच्या पूढे ३ मोठे दगडी गोळे पडलेले आहेत. दरवाज्याच्या माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. त्याने वर गेल्यावर भिंतिमध्ये अडकलेला एक तोफ गोळा दिसतो. त्यानंतरचे दुर्गावशेष किनाऱ्याजवळ आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे तटबंदीखाली असलेला भूयारी मार्ग. या भुयारात शिरायला ६ तोंड आहेत. पण सर्व तोंड बंद आहेत. रेवदंडा किल्ल्यावर सातखणी मनोऱ्याचे सात पैकी चार मजले बाकी आहेत. या मनोऱ्याला ‘‘पोर्तुगिज आरमाराचा रखवालदार‘‘ म्हणत. कारण या मनोऱ्यावरून उत्तरेला मुंबईपर्यंत व दक्षिणेकडे जंजिऱ्यापर्यंत टेहाळणी करता येत असे. या मनोऱ्याच्या पायथ्याशी तोफा पडलेल्या आहेत. याशिवाय चर्चचे अवशेष, घरांची, वाड्यांची जोती हे अवशेष आहेत

गडावरील राहायची सोय[संपादन]

गडावर राहायची सोय नाही आसपास परिसरात हॉटेल, कॉटेज, रिसॉर्ट उपलब्ध आहेत.

गडावरील खाण्याची सोय[संपादन]

खाण्याची सोय नाही आतमध्ये नाही किल्ल्या बाहेर समुद्र किनारा जवळ असल्यामुळे खाद्य पदार्थ मिळू शकते

गडावरील पाण्याची सोय[संपादन]

पिण्याच्या पाण्याची सोय नाही सोबत घेऊन जाणे सोयीचे ठरेल

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन]

किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी कोणत्याही वाटा सुस्थितीत नाही आहेत .

मार्ग[संपादन]

हा किल्ला समुद्रलगत असल्यामुळे किनाऱ्या वरून जाता येते.

जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन]

हा किल्ला जमिनीवर असल्या कारणाने 10-15 मिनिट एव्हढा कालावधी लागतो.

हे सुद्धा पहा[संपादन]